बीजेएस महाविद्यालयात दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन, इतिहासाच्या अमूल्य ठेव्याची विद्यार्थ्यांना पर्वणी

Swarajyatimesnews

२३ ते २४ जुलैदरम्यान आयोजन; सांस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय व भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम 

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

वाघोली (ता.हवेली) भारतीय इतिहास, प्रशासन आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या दुर्मीळ मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रदर्शन बीजेएस कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे २३ व २४ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग ,  पुराभिलेख संचालनालय आणि भारतीय जैन संघटनेचे  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयसंयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी ही एक दुर्मीळ संधी ठरणार आहे.

या प्रदर्शनात आज्ञापत्र, अभयपत्र, करारपत्र, जाबीतपत्र, तहनामा, सनदपत्र, वतनपत्र, जाहिरनामापत्र, बातमीपत्र, ताकीदपत्र, वर्षासनपत्र, आमंत्रणपत्र आदी विविध स्वरूपातील मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज प्रथमच एकाच छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि सामाजिक इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या या दुर्मीळ कागदपत्रांमुळे इतिहासाचे जिवंत चित्र अनुभवता येणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन २३ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांच्या हस्ते होणार असून, बीजेएस प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड अध्यक्षस्थानी तर महाविद्यालय समितीचे अध्यक्ष अरुण नाहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मोडी लिपी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवेकालीन प्रशासनात तसेच दैनंदिन व्यवहारात या लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. आजही लाखो मोडी कागदपत्रे विविध अभिलेखागार आणि संग्रहालयांमध्ये जतन करण्यात आली असून, त्यांचा अभ्यास इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या प्रदर्शनातून विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि अभ्यासकांना मोडी लिपीचा वारसा, ऐतिहासिक दस्तऐवजांचे महत्त्व आणि त्यामागील ज्ञानपरंपरा समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा बोरा व इतिहास विभाग प्रमुख डॉ भूषण फडतरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!