शिरूर-हवेली मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’; गावागावांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची मालिकारक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणीसह माता-बाल आरोग्य सेवा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
संपादक उदयकांत ब्राम्हणे
माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात ‘जनसेवा सप्ताह’ राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांची व्यापक मालिका आयोजित करण्यात आली आहे. शिरूर व हवेली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे.

या शिबिरांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, असंसर्गजन्य आजारांचे (एनसीडी) निदान, गरजेनुसार मोफत औषधांचे वितरण, आरोग्य जनजागृती व समुपदेशन अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गंभीर आजार आढळून आल्यास संबंधित रुग्णांना उच्चस्तरीय उपचारांसाठी संदर्भित करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर व शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयांसह हवेली तालुक्यातील वाघोली, पेरणे, वाडेबोल्हाई, कुंजीरवाडी, उरुळीकांचन आणि लोणीकाळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आठवडाभर ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांनी आजाराचे निदान वेळेत व्हावे आणि उत्तम आरोग्याचा लाभ मिळावा, यासाठी या मोफत शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी केले आहे.
आरोग्य सेवा गावागावांत पोहोचविण्याचा आणि प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासन आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
