मुसळधार पावसाने भीमा नदीला पूर कोरेगाव भीमाचा दहावा घाट जलमय

Swarajyatimesnews

विद्युत पंपांना पुराचा धोका; नदीकाठचा परिसर पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीने धोकादायक पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोरेगाव भीमा येथील दहावा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नदीकाठचा विस्तीर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भीमा नदीच्या काठावरील शेतीमध्ये सिंचनासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांवर (मोटारींवर) पुराच्या पाण्याचा थेट धोका निर्माण झाला. पाण्याचा वेग वाढत असल्याचे लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवल्या. मात्र, काही शेतकऱ्यांच्या मोटारी वेळेअभावी तसेच वाढत्या पाण्यामुळे जागेवरच राहिल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम असून भीमा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नदीकाठ, घाट परिसर किंवा पुराच्या पाण्यात जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचा फज्जा; कोरेगाव भीमातील यंत्रणा मुकाट!कोरेगाव भीमा व पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर नदीकाठचा परिसर धोकादायक बनला. मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीत कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे अपुरे असल्याचे समोर आले आहे. अचानक पाणी वाढल्यास ग्रामस्थांना तातडीची मदत करण्यासाठी आवश्यक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, साहित्य किंवा बचावाची व्यवस्था उपलब्ध नाही की त्याबाबत प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.

विशेष म्हणजे, अशा गंभीर परिस्थितीत गावात ग्रामविकास अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी मुक्कामी नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन संबंधित अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याने काही दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“कोरेगाव भीमातील अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वचक उरला आहे की नाही? नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन तातडीने सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!