महागाईच्या विरोधात रणशिंग, महिला सक्षमीकरण, बळीराजाच्या हक्कासाठी तालुक्यात उभारणार सक्षम संघटन – पूजा भुजबळ
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता. शिरूर) :ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरणाचा बुलंद आवाज आणि शिक्रापूर येथील माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या पूजा दीपक भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरूर तालुका महिलाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पूजा भुजबळ यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आक्रमक आणि ध्येयवादी कार्याची दखल घेत पक्षनेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या निवडीमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात पक्षाला नवी ऊर्जा मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये कमालीच्या उत्साहाचे वादळ निर्माण झाले आहे.
शिक्रापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विश्वस्त व माजी अध्यक्ष शरद पाबळे, शिक्रापूरचे सरपंच व प्रशासक रमेश गडदे, माजी उपसरपंच व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पूजा भुजबळ, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश वाबळे, उद्योजक सोमनाथ भुजबळ, दिपक भुजबळ व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर भुजबळ यांचा थेट हल्लाबोल : शिरूर तालुका महिलाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच पूजा भुजबळ यांनी सद्यस्थितीतील ज्वलंत प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, “पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत देशातील महिलांची प्रगती ‘चुलीकडून गॅसकडे’ झाली होती, महिलांना धूरमुक्त आयुष्य मिळाले होते. मात्र, आज भाजप सरकारच्या काळात वाढलेली गगनचुंबी महागाई आणि गॅसचा तीव्र तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब महिला भगिनींची पुन्हा एकदा ‘गॅसकडून चुलीकडे’ अशी अत्यंत क्लेशदायक वाटचाल सुरू झाली आहे.” ही पीछेहाट रोखण्यासाठी महिलांनी आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बळीराजा, कष्टकरी आणि विकासाचा ‘रोडमॅप’ जाहीर! : शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत भुजबळ यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली:
बळीराजाला सन्मान : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हक्काचा आणि योग्य बाजारभाव मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. दुष्काळ असो वा अतिवृष्टी, बळीराजाला शासनाकडून तातडीने आणि भरघोस आर्थिक मदतीची तरतूद मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष राहील. तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते आणि औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कंबर कसणार आहोत.
कष्टकरी कामगार आणि उद्योगांना बळ : शिरूर तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यातील कामगारांचे शोषण थांबवून त्यांना त्यांचे सर्व न्याय्य हक्क आणि कायदेशीर संरक्षण मिळवून दिले जाईल. तालुक्यात नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी अधिक पोषक आणि प्रेरणादायी वातावरण निर्मितीवर आमचा भर असेल.
पायाभूत विकास आणि आरोग्य : ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी दर्जेदार, शाश्वत विकासकामे आणि मजबूत पायाभूत सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. सर्वसामान्य, वंचित जनतेला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मोफत व सुलभतेने मिळवून देण्यासाठी आम्ही आग्रही राहू.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावागावात बांधणार ‘संघटनाची वज्रमूठ’ : “ग्रामीण भागातील प्रत्येक महिला केवळ स्वावलंबी नाही, तर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वयंपूर्ण झाली पाहिजे,” असा ठाम विश्वास पूजा भुजबळ यांनी व्यक्त केला. औद्योगिक क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सबलीकरणासाठी विशेष कृती आराखडा राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात, अगदी शेवटच्या वाडीवस्तीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मजबूत आणि सक्रिय शाखा उभारून महिलांची एक अभेद्य वज्रमूठ तयार करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पूजा दीपक भुजबळ यांच्या या महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद निवडीबद्दल शिरूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
