मंचरचे उपविभागीय अधिकारी दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

Swarajyatimesmews

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई; बांधकाम व्यवसायातून मागितली होती लाच

​मंचर : जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. एका बांधकाम प्रकल्पाचा दाखला देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा नारायणगाव परिसरात गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या एका इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. या इमारतीसाठी ‘अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्र’ (पार्शिअल कंम्प्लिशन सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. हा दाखला मंजूर करण्यासाठी शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले.

​तक्रारदाराने या संदर्भात पुणे ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आज शुक्रवारी (दि. २७) दुपारी मंचर येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. शिंदे यांनी दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. शिंदे हे वर्ग-१ चे अधिकारी असून त्यांच्यावर झालेल्या या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

​ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, प्रविण निंबाळकर व त्यांच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!