वाघोली (ता. हवेली) राधेश्वरीनगर येथील श्रीगुरुदेव दत्त मंदिरात भगवान दत्तात्रेयांचा तृतीय अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या सोहळ्यात बालस्वामींच्या दर्शनाने भाविकांचे डोळे दिपले.
उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे भूपाळी आरतीने उत्सवाची सुरुवात झाली, त्यानंतर विधिवत अभिषेक, हवन आणि ‘श्री स्वामी समर्थ सारामृत’ ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले. दुपारच्या सत्रात नैवेद्य आरती होऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बालस्वरूपातील स्वामींचे विशेष आकर्षण – सायंकाळी निघालेल्या पालखी सोहळ्याने राधेश्वरीनगरचा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘श्रीरूप’ या बालकाने साकारलेले बालस्वरूपातील स्वामी समर्थांचे रूप. स्वामींच्या वेशातील या बालकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. “श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने वातावरण चैतन्यमय झाले होते.
सेवाभावाचे दर्शन -दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात हरिपाठ आणि भजनांचेही आयोजन करण्यात आले होते. नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेल्या भाविकांनीही कामावरून परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मंदिरात उपस्थित राहून आपली सेवा अर्पण केली. उत्सवाच्या सांगतेला सर्व सेवेकऱ्यांनी आपापल्या घरून बनवून आणलेल्या प्रसादाचे ‘मांदियाळी’ स्वरूपात वाटप करण्यात आले. केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता, या उत्सवातून सामाजिक एकात्मता आणि संस्कारांचे दर्शन घडले. या आध्यात्मिक सोहळ्यामुळे मनाला शांती आणि नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
