तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटाचा कायापालट करणार – दिपाली गव्हाणे 

Swarajyatimesnews

केंद्र व राज्याचा निधी खेचून आणू; बापूसाहेब पठारे यांच्या विकासकार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)”तळेगाव ढमढेरे – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य, कष्टकरी आणि तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने विकासाचा निधी खेचून आणणे सुलभ होणार असून, हा संपूर्ण गट सुजलाम सुफलाम करून दाखवू,” असा ठाम विश्वास भाजपच्या अधिकृत उमेदवार दिपाली गव्हाणे यांनी व्यक्त केला.

रांजणगाव सांडस येथे आयोजित झंझावाती प्रचार दौऱ्यादरम्यान त्या मतदारांशी संवाद साधत होत्या. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

विकासाचा ‘रोडमॅप’ आणि थेट संवाद : प्रचार दौऱ्यात दिपाली गव्हाणे यांनी केवळ भाषणे न करता मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. शेतीसाठी पाणी, अंतर्गत रस्ते, अद्ययावत आरोग्य सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विशेषतः महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी या विषयांवर त्यांनी आपले व्हिजन मांडले. “निधीअभावी विकासाचे कोणतेही काम रखडणार नाही. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अनुभवाचे पाठबळ आणि आश्वासक नेतृत्व : दिपाली गव्हाणे यांच्या पाठीशी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या जनसेवेचा वारसा आणि संस्कार आहेत. बापूसाहेबांची लोकाभिमुख कार्यपद्धती गव्हाणे यांच्या प्रचारात प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच, पुणे जिल्हा भाजप पदवीधर आघाडीचे अध्यक्ष राहुल गव्हाणे यांचे संघटन कौशल्य आणि प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव दिपाली गव्हाणे यांच्यासाठी मोठी शक्ती ठरत आहे.

उच्चशिक्षण आणि अभ्यासू व्यक्तिमत्व : एक उच्चशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून दिपाली गव्हाणे यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रशासनाशी संवाद साधण्याची क्षमता आणि प्रश्नांची सखोल जाण ही त्यांची बलस्थाने ठरत आहेत. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी त्यांनी मांडलेला ठोस आराखडा महिला मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

“राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. बापूसाहेब पठारे यांची विकासाची दृष्टी आणि राहुल गव्हाणे यांचे नियोजन यांच्या बळावर या गटाचा सर्वांगीण विकास साधून नवा आदर्श उभा करेन.”— दिपाली गव्हाणे (उमेदवार, भाजप)

मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता, तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटात दिपाली गव्हाणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!