जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटाला सोनोग्राफी करण्यापूर्वी जेलीऐवजी ॲसिड(किंवा तत्सम दाहक रसायन) लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे.
नेमकी काय घडली घटना? खापरखेडा वाडी येथील रहिवासी महिलेला तिसऱ्या प्रसूतीसाठी २४ जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाचे ठोके तपासण्यासाठी डॉक्टरांनी डॉपलर टेस्ट करण्याचे ठरवले. याचवेळी, संबंधित नर्सने सोनोग्राफीसाठी वापरण्यात येणाऱ्या जेलीऐवजी चुकून फिनाईल किंवा आयोडीनसारखे केमिकल महिलेच्या पोटाला लावले. यामुळे महिलेच्या पोटाची त्वचा सुपरफिशियल बर्न (पृष्ठभागीय भाजल्यासारखी) झाली.
रुग्णालयातील एका ब्रदरने सोनोग्राफी रूममधील औषधांच्या ट्रेमध्ये सोल्युशनऐवजी ॲसिड ठेवल्याने हा प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना सांगण्यात आले आहे. मात्र, घटनेनंतर महिला वेदनेने ओरडू लागल्यावर नातेवाईकांनी नर्सला विचारणा केली असता, नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड करून रुग्णालयातून दोन तास पसार झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे भोकरदन ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सध्याची स्थिती आणि पुढील कार्यवाही – सध्या गंभीर भाजलेल्या महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कृत्य चुकून घडले की जाणूनबुजून, याचा अहवाल वैद्यकीय अधीक्षकांकडून मागवण्यात आला आहे. त्यांनी सध्या आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि स्थिर अवस्थेत असल्याची माहिती दिली आहे. रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी रुग्णालयाकडे लेखी तक्रार देण्याचा इशारा दिला आहे.
रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात ॲसिड वापरले जात नसल्याचे स्पष्ट केले असून, वापरले गेलेले द्रव्य फिनाईल असण्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेतील संबंधित नर्स आणि डॉक्टरांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.