लोणीकंद (ता.हवेली) पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील एका बालकाश्रमात एक संतापजनक घटना घडली असून दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बालकाश्रमात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेश दगडू साठे (वय 55, राहणार दत्तवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश साठे याने गेल्या काही महिन्यांपासून बालकाश्रमातील 10 आणि 11 वर्षीय दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केले. मुलांनी कुणाला काही सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही देत होता. या गंभीर प्रकाराची माहिती सहयाद्री आदिवासी ग्रामीण वकास प्रतिष्ठानच्या संचित व्यवस्थापकांना समजताच त्यांनी तात्काळ लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलांनी पोलिसांना सांगितली हकिगत दरम्यान, या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता, पण आता या प्रकरणाचा तपास लोणीकंद पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मुलांशी संवाद साधला असता, त्यांनी संपूर्ण हकिगत सांगितली.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश साठे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.