आजरा शहरात एका नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस गिझरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सागर सुरेश करमळकर (वय ३२) आणि सुषमा सागर करमळकर (वय २६) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आंबोली येथे फिरायला गेले होते. आज सकाळी त्यांच्या मित्रांनी फोन केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरी जाऊन पाहणी केली. घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर दोघेही बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, गॅस गिझरमधून वायू गळती होऊन बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड जमा झाला असावा. त्यामुळे दम घुटून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे करमळकर कुटुंबीयांवर आणि त्यांच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच संसार सुरू केलेल्या या जोडप्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आजरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.