वाघोलीतील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेचे पेपर रात्री लिहिण्यास देणाऱ्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक

Swarajyatimesnews

दोन लाख रुपयांसह महत्त्वाचा मुद्देमाल जप्त; ८ विद्यार्थ्यांचीही ओळख पटली

पुण्यातील वाघोली येथे असलेल्या पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परिक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजमध्ये दिवसा झालेला परिक्षेचा पेपर रात्री उशिरा पुन्हा लिहून घेतला जात होता. पुणे गुन्हे शाखेने छापा टाकून कॉलेजच्या एका प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये कॉलेजमधीलच वरिष्ठ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांची नावे: प्राध्यापक प्रतिक किसन सातव (वय ३७),आदित्य यशवंत खिलारे (वय २०,  विद्यार्थी),अमोल अशोक नागरगोजे (वय १८,  विद्यार्थी), अनिकेत शिवाजी रोडे (वय २०,  विद्यार्थी)

त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स २ या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, २ लाख ६ हजार रुपये रोख रक्कम आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी जप्त करण्यात आली आहे.

कसा होता हा गैरव्यवहार? – परिक्षा झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला आहे किंवा आपण नापास होऊ अशी भीती वाटते, अशा विद्यार्थ्यांना हे आरोपी हेरत असत. त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेऊन त्यांना रात्री पुन्हा त्याच पेपरची उत्तरे लिहिण्यास दिली जात होती. हा प्रकार मागील काही दिवसांपासून वाघोलीमध्ये सुरू होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानुसार, मंगळवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर छापा टाकला. त्यावेळी प्राध्यापक प्रतिक सातव हे पहिल्या वर्षाच्या ‘इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स २’ या पेपरची उत्तरे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पुन्हा लिहून घेण्याच्या तयारीत होते.

विद्यार्थ्यांचाही सहभाग – प्राध्यापक प्रतिक सातव हा गैरव्यवहार करण्यासाठी कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांना हाताशी धरत होता. आदित्य खिलारे हा विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करण्याचे आणि त्यांना रात्री बोलावून पेपर लिहून घेण्याचे काम करत असे. अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे हे दोघेही याच कॉलेजचे वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी असून, ते बनावट चावीने कंट्रोल रूम उघडून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत, त्यांचे पेपर बंडलमधून शोधून काढत असत. पेपर लिहून झाल्यावर ते पुन्हा जागेवर ठेवण्याचे कामही हे दोघे करत होते. पोलिसांनी आदित्यने पैसे घेतलेल्या ८ विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून, त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक परिक्षा (अयोग्य साधनांचे प्रतिबंध) अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!