चालक मालकावर गुन्हा दाखल
केसनंद (ता. हवेली) – लायसन्स नसलेल्या चालकाच्या ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली. मृत व्यक्तीचे नाव रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. दौंड) असे आहे.
या प्रकरणी मयताचे बंधू यशवंत गायकवाड (वय ४०) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक मालक संतोष आत्माराम भंडारे (वय ४७) व चालक जनार्दन बाबुराव चव्हाण (वय ६३, रा. यवत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपना मेडिकल केसनंद गाव चौक समोर वाघोलीकडून वाडे बोल्हाईकडे दुचाकीवरून जात असताना यवत बाजूकडून लोणीकंद कडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील रामदास साहेबराव गायकवाड (वय ५२, रा. लाडबा वस्ती, केसनंद) हे ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर वाघोली पोलिसांनी ट्रक चालक जनार्दन बाबुराव चव्हाण (वय ६३, रा. यवत) याच्यावर तसेच चव्हाण याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात दिल्याने चव्हाण याने भरधाव वाहन चालवून अपघात केल्याने डंपर मालक संतोष भंडारे (रा. वढू) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.