लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’

Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे.

साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन करण्यासाठी विशेषतः केंदूर (ता. शिरूर) येथील संत कान्हुराज पाठक महाराजांना निमंत्रित केले होते. तेव्हापासून द्वादशीच्या दिवशी त्यांच्या वंशजांच्या कीर्तनाचा मान आजतागायत चालत आला आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली, पाठक महाराजांना काका म्हणत असत, तर पाठक महाराजांनी बालवयातील ज्ञानोबा व त्यांच्या भावंडांना आपल्या घरी आश्रय दिला होता. दोन्ही संतांचे पंढरपूरला जाण्याचे मार्ग वेगवेगळे असूनही लोणंद येथे दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीया दिवशी त्यांची औपचारिक भेट होत असते. मात्र यावर्षीपासून या भेटीला ‘काका-पुतणे भेट सोहळा’ असे अधिकृत स्वरूप देण्यात येत आहे.

ही माहिती संत कान्हुराज पाठक महाराजांचे १६वे वंशज कीर्तनकार सारंग महाराज राजपाठक आणि दिंडी सोहळ्याचे विश्वस्त रंगनाथ थिटे गुरुजी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पाठक महाराज हे नाथ संप्रदायाचे अनुयायी असून, त्यांनी वारकरी आणि भागवत धर्माच्या प्रसारासाठीही योगदान दिले.

चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना भेटवण्यासाठी मध्यस्थ म्हणून कान्हुराज पाठकांची मदत घेतली होती, ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही या भेटीचे महत्व अधोरेखित करते. संत निळोबांनी लिहिलेला या भेटीवरील अभंग याचे साक्षी आहे.संजीवन समाधीचा सगुण-निर्गुणातला भावार्थही ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत कान्हुराज पाठक महाराजांकडून सांगितला गेला होता.दरम्यान याच अनुषंगाने चर्चा करुन व काका पुतण्या भेट सोहळ्याबाबत निर्णय अंतीम करुनच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी नुकताच सन्मान केल्याचेही श्री राजपाठक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!