मांजरी खुर्द (ता.हवेली) – पुण्यातील वाघोली जवळील मांजरी खुर्द येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) या फळविक्रेत्या दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
सदर घटना रविवारी (११ मे) रात्री घडली असून सोमवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचना ही आत्महत्येचे संभाव्य कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.वारुळे दांपत्य आव्हाळवाडी येथे वास्तव्यास होते आणि वाघोली येथील आठवडे बाजारात फळ विक्रीचे काम करत होते. अत्यंत कष्टाळू आणि शांत स्वभावाचे म्हणून परिसरात त्यांची ओळख होती.
वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उशिरा घर बंद असल्याचे लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दार उघडताच ही घटना उघडकीस आली.या दुःखद घटनेमुळे वाघोली व परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजात आर्थिक, मानसिक व सामाजिक आधार व्यवस्था अधिक सक्षम होण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अशा घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी संयुक्तरीत्या पावले उचलण्याची गरज आहे.
विनम्र आवाहन: आत्महत्येचे विचार येत असल्यास कृपया थांबा – मदतीसाठी पुढील हेल्पलाइनवर संपर्क करा:📞 संपर्क: 9152987821 (मनोविकास सेवा संस्था – पुणे)📞 आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन (AASRA): 91-9820466726, मदतीसाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन: 14416
तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत बोलायला, ऐकायला आणि मदत करायला कोणी ना कोणी नेहमी तयार आहे. टोकाचा निर्णय घेण्यागोदर कुटुंबाचा विचार करा.