आपटी येथील २५ वर्षीय महिलेचा भीमा नदीकाठी आढळला मृतदेह; ११ महिन्यांच्या चिमुकलीचे छत्र हरपले; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या आपटी (ता. शिरूर) येथील २५ वर्षीय तरुण विवाहितेचा मृतदेह कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.

आपटी येथील रहिवासी असलेल्या निकीता अविनाश गाडेकर (वय २५) या मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेल्या होत्या. त्या परत न आल्याने पती अविनाश गाडेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि नातेवाईक त्यांचा सातत्याने शोध घेत होते.

दरम्यान, रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्तीजवळ भीमा नदीकाठी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच पतीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, अंगावरील भिजलेल्या कपड्यांवरून तो मृतदेह निकीता यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह तात्काळ शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अवघ्या २५ वर्षांचे वय आणि पाठीशी ११ महिन्यांची लहान मुलगी असताना निकीता यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. कौटुंबिक ताणतणाव, मानसिक अस्वस्थता की अन्य काही कारण, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी पती अविनाश भगवान गाडेकर (वय ३०, रा. आपटी) यांनी दिलेल्या खबरीवरून शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद  केली असून, पोलीस या घटनेमागील नेमक्या कारणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!