रक्तदान करणाऱ्यांसाठी ई-स्कूटर, फ्रिज, सायकलींसह रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटात बुधवार (दि. २२ जुलै) रोजी भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर–आंबेगाव आणि केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटाच्या वतीने आयोजित या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देतानाच स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, मोफत चष्म्यांचे वाटप तसेच गरजूंना मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चाकण ब्लड बँक, शिवनेरी ब्लड सेंटर, अक्षय ब्लड सेंटर आणि पद्मश्री डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

रक्तदानाला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा, यासाठी यंदा आकर्षक लकी ड्रॉ योजना जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटातून रक्तदान करणाऱ्या नागरिकांमधून प्रथम बक्षीस म्हणून ई-स्कूटर, द्वितीय बक्षीस म्हणून फ्रिज, प्रत्येक केंद्रासाठी एक सायकल, तर प्रत्येक रक्तदात्यास टिफीन आणि हेडफोन भेट देण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमात प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांचे मार्गदर्शनही लाभणार असून सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदानाचे महत्त्व याविषयी ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटातील केंदूर, पाबळ, करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बुद्रुक, आपटी, धामारी, खैरेनगर, जांबूत, जांबूत खुर्द, शिरूर आणि खैरवाडी या गावांमध्ये स्वतंत्र रक्तदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. करंदी येथील मयुरी लॉन्स, चौफुला (ता. शिरूर) येथे मुख्य शिबिर पार पडणार आहे.
“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात रक्तदान आणि आरोग्यसेवा हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते, तर ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंदूर–पाबळ जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकाने या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा आणि समाजहिताच्या या अभियानाला यशस्वी करावे,” असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल काळुराम शिवले यांनी केले.
या जनसेवा उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे तसेच मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजसेवा, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम घडविणारा हा उपक्रम तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकहिताच्या कार्यक्रमांपैकी एक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
