महामार्गावरील २०० अनधिकृत जाहिरात फलक हटविले; शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

Swarajyatimesnews

अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेला धोका ठरणारे तब्बल २०० अनधिकृत जाहिरात फलक शिक्रापूर पोलिसांनी हटवून धडक कारवाई केली. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या या फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता कमी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार मिलिंद देवरे आणि पोलीस अंमलदार लखन शिरसकर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. महामार्गाच्या दुभाजकावर उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक हटवून वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले.
महामार्गावरील फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत होते. तसेच रस्ता ओलांडणारे नागरिक, दुचाकीस्वार किंवा अचानक समोर येणारी वाहने वेळेत न दिसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत महामार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला.
कारवाईदरम्यान संबंधित व्यावसायिकांना भविष्यात महामार्ग किंवा दुभाजकावर कोणतेही अनधिकृत जाहिरात फलक उभारू नयेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
या मोहिमेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना रस्ता अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होणार असून वाहतुकीची सुरक्षितता वाढून संभाव्य अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

चुकीच्या पद्धतीने लावलेला फ्लेक्स जीवावर बेतू शकतो!

महामार्गावरील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शिक्रापूर पोलीस, शिक्रापूर ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांच्या मदतीने सातत्याने प्रयत्नशील आहेत. भविष्यात अनधिकृत फलक लावणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फ्लेक्समुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून ग्रामपंचायत तसेच पीएमआरडीएची आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच जाहिरात फलक उभारावेत.– पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, , शिक्रापूर पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!