शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन
शिक्रापूर राजाराम गायकवाड
चासकमान विभागाअंतर्गत येणाऱ्या कालवा क्रमांक ११, १२, १३ तसेच वेळ नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी तातडीने सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. १) चासकमान विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता धनंजय गावकर यांच्या कार्यालयात ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून ४ किंवा ५ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन गावकर यांनी दिले.
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने यापूर्वी ४ मे व १८ मे २०२६ रोजी स्वतंत्र पत्रांद्वारे कालवा क्रमांक ११, १२, १३ तसेच वेळ नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीस पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित वेळेत पाणी सोडणे शक्य झाले नसल्याची माहिती देत सहाय्यक कार्यकारी अभियंता गावकर यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
सध्या परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत सापडले असून विहिरी व जलस्रोतांची पातळीही घटली आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, ४ किंवा ५ जूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही तर शेतकरी व ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस शिक्रापूरचे सरपंच तथा प्रशासक रमेश गडदे, उपसरपंच प्रकाश वाबळे, शिरूर तालुका भाजप उपाध्यक्ष राजाभाऊ मांढरे, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, पत्रकार राजाराम गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पाणीप्रश्नी प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होते, याकडे आता संपूर्ण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
