भक्ती, सेवा आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम; बाराशे भाविकांनी घेतला ‘दत्त-पांडुरंगाचा’ आशीर्वाद
वाडेबोल्हाई (ता. हवेली) : श्रद्धेचा ओलावा, सेवेचे समर्पण आणि गावाबद्दलचा अतोनात जिव्हाळा… याचा प्रत्यय नुकताच वाडेबोलाईकरांना आला. गावाच्या माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर ही तीर्थयात्रा केवळ एक प्रवास न ठरता भक्तीचा सोहळा ठरली. यात्रेहून परतलेल्या भाविकांचे पाटस येथील कार्यालयात ‘मासवडी’च्या गावरान बेताने स्वागत करण्यात आले, ज्याने श्रद्धेसोबतच चविष्ट भोजन तृप्तीचा आनंद मिळाला.

भक्तीची वारी आणि जिल्हाधिकारी’ साहेबांची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद – सकाळी वेताळ बुवा मैदानातून २७ बसेसचा ताफा जेव्हा निघाला, तेव्हा संपूर्ण परिसर ‘विठ्ठल-रखुमाई’ आणि ‘स्वामी समर्थांच्या’ जयघोषाने दुमदुमून गेला. पंढरपूरचे दर्शन आणि अक्कलकोटचा मुक्काम आटोपून ही वारी गाणगापूरच्या दिशेने निघाली. कर्नाटक सीमेवर उद्भवलेली तांत्रिक अडचण गावचे सुपुत्र तथा परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने चुटकीसरशी सोडवली. यामुळे १२५० भाविकांना दत्तगुरुंच्या चरणी लीन होता आले.


पाटस येथे भक्तांच्या तृप्तीचा सोहळा – यात्रेवरून परतताना भाविकांसाठी पाटस येथील कार्यालयात विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. गावरान ठसका असलेल्या चविष्ट ‘मासवड्या’ आणि मायेने वाढलेला प्रसादाचा घास घेऊन भाविक सुखावले. केवळ भोजनच नव्हे, तर ‘लेकीने’ करावी तशी काळजी वाहत सविता गावडे यांनी प्रत्येक ग्रामस्थांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची चोख व्यवस्था केली.

विकासाच्या दृष्टिकोनाला श्रद्धेची जोड – “संवादातून सेवा आणि सेवेतून गावचा विकास” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून सविता गावडे यांनी या यात्रेचे नियोजन केले होते. या उपक्रमात दिसलेली त्यांची संघटनशक्ती आणि लोकांप्रती असलेली आपुलकी पाहून ग्रामस्थांनी “सविता वहिनी, तुमचा विजय होणारच” अशा शब्दांत आगामी काळासाठी भरभरून आशीर्वाद दिले.

”ही तीर्थयात्रा म्हणजे भगवंताचा दर्शनरुपी आशीर्वाद असून हे वाडे बोल्हाई गाव आमचे कुटुंब असून प्रत्येक ग्रामस्थांच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून जोडले गेलेले भक्तीचे, सेवा ,समर्पण व विकासाचे नाते आणि माय-बाप ग्रामस्थांच्या मनातील समाधान हाच माझ्यासाठी आशीर्वाद आहे.” —माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे , वाडेबोलाई


