स्त्रीशक्तीच्या जागरणासाठी आणि आरोग्यासाठी गडकिल्ले मोहिमांचे आयोजन ही काळाची गरज आहे – नगरसेवक ऐश्वर्या पाटील पठारे.”
स्वराज टाईम्स वृत्तसेवा
पुणे: ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात किल्ले सिंहगड रविवारी महिलांच्या जिद्दीने न्हाऊन निघाला. सखी प्रेरणा मंच आणि फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विशेष हिरकणी ट्रेक’ मोहिमेत २८९० महिलांनी सहभाग नोंदवत स्त्रीशक्तीचे दर्शन घडवले. ५ वर्षांच्या बालिकेपासून ७० वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनीच २.५ तासांत गड सर करत स्वराज्याच्या इतिहासाला मानाचा मुजरा केला.
स्त्रीशक्तीची ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना वंदन करून सुरू झाली. गड चढताना महिला भगिनींच्या चेहऱ्यावर थकवा नसून स्वराज्याच्या इतिहासाचा अभिमान ओसंडून वाहत होता. फोर्ट फिट मुव्हमेंटचे हे पाचवे यशस्वी पुष्प असून, केवळ महिलांसाठी आयोजित केलेली ही मोहीम शिस्त आणि नियोजनाचा आदर्श ठरली.

या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सहभागी महिलांचे वय. एका बाजूला चिमुकल्या मुली आपल्या मातांसोबत डोंगर चढत होत्या, तर दुसऱ्या बाजूला ७० वर्षांच्या ज्येष्ठ माता तरुण पिढीला लाजवेल अशा ऊर्जेने चढाई करत होत्या. “जिजाऊंच्या लेकी आम्ही, स्वराज्याच्या रणरागिणी” या ब्रीदवाक्याला जागून प्रत्येक महिलेने ही मोहीम यशस्वी केली.
गडावर पोहोचल्यानंतर शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी आणि स्मारकापाशी अभिवादन करण्यात आले. मावळ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या या मातीत उभे राहून महिलांनी शिवकालीन इतिहासाचे स्मरण केले. या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्यासोबतच आपल्या वैभवशाली दुर्गपरंपरेची नाळ अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे.

“महिलांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि उमेद आहे. त्यांच्या आरोग्यासाठी आणि इतिहासाच्या जागरणासाठी अशा मोहिमांची गरज आहे. आगामी काळातही अशा विविध गडकिल्ले मोहिमांचे आयोजन करून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.” नगरसेवक ऐश्वर्या पाटील पठारे , आयोजक, सखी प्रेरणा मंच व फोर्ट फिट मुव्हमेंट
