पंडित प्रदीपजी मिश्रांनी उलगडले शिवतत्वाचे मर्म!

Swarajyatimesnews

हर हर महादेव’च्या जयघोषाने शिरूर नगरी दुमदुमली; शिवकथेत जनसागर तल्लीन

शिरूरच्या मातीत सध्या भक्तीचा मळा फुलला असून, ‘ओम जय शिव ओंकारा’ आणि ‘मेरा भोला भंडारी’च्या सुरावटींनी आसमंत शिवमय झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. टाळ्यांचा कडकडाट, भजनांचा ठेका आणि डोळ्यांत साठवलेला भाव अशा अभूतपूर्व वातावरणात अवघा सभामंडप शिवभक्तीत न्हाऊन निघाला आहे.(Prakash Dhariwal Shivkatha Shirur)

भक्ती अन् समर्पण: महादेवाला प्रेम आणि समर्पण प्रिय – “भगवान शंकराला तुमची धनसंपत्ती किंवा पद-प्रतिष्ठेची अपेक्षा नसते, तर त्यांना केवळ भक्ती, प्रेम आणि पूर्ण समर्पण प्रिय आहे,” अशा शब्दांत पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवतत्वाचा उलगडा केला. रावणाने शीर अर्पण केले, पण प्रभू श्रीरामांनी हृदय अर्पण करून केलेली भक्ती शिवाला अधिक भावली, असा पौराणिक दाखला देत त्यांनी श्रद्धेचे महत्त्व पटवून दिले. दैनंदिन जीवनात केवळ ‘एक लोटा जल’ अर्पण केल्यास आयुष्यातील संकटे दूर होतात, हा त्यांचा मंत्र ऐकताना भाविक भारावून गेले होते.(Pandit Pradeep Mishra Shivmahapuran Shirur)

भाविकांचे अश्रू आणि भक्तीचा आनंद – कथेदरम्यान पंडितजी जेव्हा भाविकांची पत्रे आणि त्यांना आलेले अनुभव वाचून दाखवत होते, तेव्हा अनेकांना अत्यानंदाने अश्रू अनावर झाले. डोक्यावर तुळशीवृंदावन आणि मंगल कलश घेऊन आलेल्या महिलांनी शिवगीतांवर फेर धरला, तर अबालवृद्धांनी रासगरब्यात गुंग होऊन ठेका धरला. कथेच्या शेवटी जेव्हा लाखाे हातांनी आरत्या उजळल्या, तेव्हा संपूर्ण सभामंडप एका दिव्य तेजाने उजळून निघाला होता.

मोबाईलच्या व्यसनावर सडेतोड प्रहार –पंडितजींनी आजच्या पिढीच्या मोबाईल व्यसनावर अत्यंत परखड भाष्य केले. “भावी पिढी मोबाईलच्या अतिवापरामुळे अकार्यक्षम होत आहे आणि याला पालकच जबाबदार आहेत,” असे ते म्हणाले. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी पालकांची असून, पालकांनी स्वतः मोबाईलचा मोह सोडल्याशिवाय मुले सुधारणार नाहीत, असा सडेतोड सल्ला त्यांनी दिला.

पी. आर. धारीवाल फाउंडेशनद्वारे आयोजित या सोहळ्यात निमंत्रक प्रकाश धारिवाल, दीना धारिवाल आणि आदित्य धारिवाल यांनी पोथी व मंगल कलश डोक्यावर घेऊन व्यासपीठावर आगमन केले. याप्रसंगी विजय दुगड, प्रवीण दसगुडे, मनसुखलाल गुगळे, दौलत शितोळे, डॉ. प्रणोती जगताप, नितीन पाचर्णे, राजेंद्र लोळगे, नामदेवराव घावटे, महेश रासने, गणेश कोळपकर, ऐश्वर्या पाचर्णे, मितेश गादिया, सुनील धारिवाल, विनोद धारिवाल, जाकीरखान पठाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.(Pandit Pradeep Mishra Shivmahapuran Shirur)

रसिकलाल धारिवाल यांच्या शिवभक्तीची पुण्याई आणि धारिवाल कुटुंबीयांचे नियोजन यामुळे शिरूरमध्ये सुरू असलेला हा सोहळा केवळ धार्मिक नसून तो संस्कारांचा जागर ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!