शिरूरमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रांच्या अमृतवाणीतून घुमणार शिवनामाचा गजर

Swarajyatimesnews

 २४ फेब्रुवारीपासून भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन

शिरूर नगरीत आध्यात्मिक चैतन्याचा नवा सोहळा रंगणार असून, आगामी २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत भव्य ‘श्री शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वाले) यांच्या सुश्राव्य वाणीतून हा भक्तिसोहळा पार पडणार असल्याची माहिती उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवा उद्योजक आदित्य धारिवाल आणि माजी नगरसेवक विजय दुगड उपस्थित होते.

पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही कथा शिरूर येथील रामलिंग रोडवरील उद्योगपती स्व. रसिकलाल धारिवाल नगरीत संपन्न होईल. मंगळवार, २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा कार्यक्रम दररोज दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या ओजस्वी वाणीतून शिवमहापुराणातील दिव्य प्रसंग, शिवतत्त्वज्ञान आणि मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारा भक्तिमार्ग भाविकांना अनुभवायला मिळणार आहे.

या भव्य आयोजनासाठी धारिवाल परिवाराचे विशेष सहकार्य लाभले असून, प्रकाश धारिवाल, दिनाभाभी धारिवाल आणि आदित्य धारिवाल यांनी या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. शिरूर शहर आणि परिसरातील शिवभक्तांनी या पवित्र कथाश्रवणाचा लाभ घेण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

“शिरूरच्या पावन भूमीत हा आध्यात्मिक योग जुळून आला आहे. शिवमहापुराण ही केवळ कथा नसून ती मानवी जीवनाला सन्मार्ग दाखवणारी शिदोरी आहे. या मंगलमय सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होऊन भक्तीचा आनंद घ्यावा आणि पुण्यलाभ मिळवावा, हीच आमची भावना आहे.”— प्रकाशशेठ धारिवाल (ज्येष्ठ उद्योगपती)

संपूर्ण शिरूर आणि पंचक्रोशीतील वातावरण सध्या या सोहळ्यामुळे शिवमय झाले असून, हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने नियोजनाची कामे वेगाने सुरू आहेत. अध्यात्म, भक्ती आणि समाजहिताचा संदेश देणारा हा सोहळा शिरूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!