लोणीकंद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

Swarajyatimesnews

पोलीस दलावर शोककळा, ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराचे मानकरी; शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाला हृदयविकाराचा काळा घाला

दिनांक १ फेब्रुवारी  लोणीकंद (ता.हवेली) कर्तव्यदक्षता आणि संयमी स्वभावाचा आदर्श असलेले लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत निष्ठेने ड्युटी बजावून घरी परतलेल्या या हसतमुख अधिकाऱ्याची प्राणज्योत मध्यरात्री २ च्या सुमारास मालवली. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह लोणीकंद-वाघोली परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

सर्जेराव कुंभार यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात कार्यरत राहून ते वडगावशेरी येथील आपल्या घरी परतले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. मध्यरात्री अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना गाठले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

कुंभार यांची ओळख एक शांत पण कृतीशील अधिकारी म्हणून होती. नुकत्याच पार पडलेल्या २५ ते २७ जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता. योगायोगाने याच तीन दिवसांत वाघोली परिसरात दोन खुनाच्या गंभीर घटना घडल्या. मात्र, विचलित न होता त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली. पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन सलग दोन वर्षे त्यांनी अतिशय सुरक्षितपणे हाताळले होते.

सुरक्षित पुणे’ पुरस्काराचे मानकरी : त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल २०२५ मध्ये त्यांना ‘सुरक्षित पुणे’ या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सहकाऱ्यांशी हसतमुखाने वागणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न संयमाने ऐकून घेणारे अधिकारी म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. त्यांची मुलगी सिद्धी ही सध्या ‘बीएएमएस’चे शिक्षण घेत असून, वडिलांच्या या अचानक जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सर्जेराव कुंभार यांच्या पार्थिवावर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकाऱ्याला पुणे पोलीस दलाने आज गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसिंग’मधील तणावाचा अदृश्य विळखाकुंभार यांच्यासारख्या तंदुरुस्त आणि हसतमुख अधिकाऱ्याचे अचानक जाणे हे पोलीस दलातील वाढत्या मानसिक आणि शारीरिक तणावाचे निदर्शक मानले जात आहे. २४ तास ड्युटी, अपुरी झोप, सण-उत्सवांचा बंदोबस्त आणि गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. ‘आधी कर्तव्य’ या भावनेतून अहोरात्र राबणाऱ्या शरीराला विश्रांती न मिळाल्याने हृदयविकारासारखा धोका बळावतो, अशी हळहळ आता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!