जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत वर्गात आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
सध्या तरी रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, आत्महत्येमागील कारणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे म्हटले जात आहे.
रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील मूळ रहिवासी होते. सुपडू बहादू शाळेत कार्यरत असल्यामुळे ते गेल्या काही वर्षांपासून पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते.या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.