मानसोपचार तज्ज्ञाच्या मृत्यूने खळबळ..
अकोला: जे डॉक्टर लोकांना तणावातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर झटले, त्याच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी स्वतःच तणावातून बाहेर न पडता विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. त्यांच्या या मृत्यूने केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही, तर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यातील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. न्यू तापडिया नगर भागातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट – कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ज्यांनी शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केले, त्याच डॉक्टरांनी तणावातून आत्महत्या करावी, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांच्या या कृत्यामागे कोणत्या प्रकारचा तणाव होता, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. प्रशांत जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सन्मित्र हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक रुग्णांना मानसिक आधारातून सावरले होते. अशा एका संवेदनशील डॉक्टराने असे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.