जेजुरी – जेजुरी-मोरगाव रोडवरील श्रीराम ढाब्याजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये ढाब्यासमोर उभे असणारे व टेम्पोमधील साहित्य उतरवणारे नागरिक आणि स्विफ्ट डिझायर कारमधील प्रवासी यांचा समावेश आहे.
पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगाने निघालेली स्विफ्ट डिझायर कार (MH 42 AX 1060) जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना, श्रीराम ढाब्यासमोर साहित्य खाली करत असलेल्या टेम्पो (MH 12 XM 3694) ला जोरात धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारला (MH 12 TK 9483) देखील धक्का बसला.
मृतांची ओळख अद्याप अस्पष्ट – या अपघातात टेम्पोमधील साहित्य खाली करत असलेले २ जण, ढाब्यासमोर उभे असलेले ३ जण, आणि स्विफ्ट कारमधील ३ प्रवासी जागीच ठार झाले.
या भीषण अपघातात दोन मुले, एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल होताच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे सांगत, या रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.