सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म
शिरुर तालुक्यातील शिक्रापूरजवळील मलठण फाटा परिसरात सर्पमित्राच्या गाडीतच एक अतिविषारी घोणस जातीचा साप मादी असल्याचे लक्षात येताच मोठा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. या सापाने थेट कारमध्ये ठेवलेल्या बरणीतच तब्बल २७ पिल्लांना जन्म दिला असून, या दुर्मीळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाच्या सरी सुरू असताना वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप फिरत असल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांनी घोणस जातीचा अतिविषारी साप सुरक्षितपणे बरणीत पकडून आपल्या वाहनात ठेवला.
सकाळी या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बरणी उघडली असता, त्यात सापासोबत त्याने नुकतेच जन्म दिलेली २७ पिल्ले असल्याचे दिसून आले.
ही माहिती तातडीने शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना देण्यात आली. नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेरखान शेख, नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सचिव शुभांगी टिळेकर, अमोल कुसाळकर, आयान शेख यांच्या उपस्थितीत या सर्व नवजात सापपिल्लांना आणि मादी सापाला सुरक्षितपणे जंगलात मुक्त करण्यात आले.