बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; बुलेटस्वारांच्या हुल्लडबाजीसमोर पोलीस प्रशासन हतबल की मेहेरबान?

Swarajyatimesnews

बुलेटच्या आवाजात ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत?

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) : ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत? बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; महाराजांच्या नावाने हुल्लडबाजी करणाऱ्यांनो, आऊसाहेबांचे संस्कार विसरलात का? असा प्रश्न उपस्थित होत असून या बुलेटचा आवाज फटाकड्यासारखा काढणाऱ्या तरुणाईवर कायदेशीर कठोर कारवाई होऊन या धांगड धिंगा घालणाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज शिवजयंती! छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या रयतेला एकत्र करून स्वराज्य निर्माण केले, त्या महाराजांचा जन्मोत्सव कोरेगाव भिमा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, या उत्सवात ‘विचारांच्या’ आवाजापेक्षा बुलेटच्या ‘सायलेन्सरचा’ आवाज मोठा होताना दिसत आहे. हातात भगवा झेंडा घेऊन, कपाळावर चंद्रकोर लावून बुलेटवरून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या तरुणांमुळे आज कोरेगाव भिमा, सणसवाडी,शिक्रापूर  परिसरातील रुग्ण, वृद्ध आणि लहान मुले अक्षरशः दहशतीखाली आहेत.

वैचारिक जागर की केवळ देखावा? – छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रजेच्या सुखाचा विचार केला. मात्र, आजचे हे स्वयंघोषित ‘शिवभक्त’ रयतेलाच आवाजाच्या प्रदूषणाने वेठीस धरत आहेत. एकीकडे काही सुजाण तरुण गड-किल्ल्यांची स्वच्छता करत आहेत, शिवचरित्राचे वाचन करत आहेत, तर दुसरीकडे बुलेटच्या सायलेन्सरमधून ‘विकृत’ आनंद शोधणारी ही पिढी शिवरायांचा कोणता आदर्श समोर ठेवत आहे?

प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा : रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका” ही महाराजांची शिस्त होती. मग आज पोलिसांसमोर हे तरुण कायद्याचे उल्लंघन करत असताना पोलीस प्रशासन गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. अशा हुल्लडबाजांच्या गाड्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वेळ आता आली आहे. “महाराजांचे नाव घेऊन सामान्यांना त्रास देणे हा शिवद्रोहच आहे. शिवजयंती ही बुलेटच्या आवाजाने नाही, तर विचारांच्या आचरणाने साजरी व्हायला हवी.”

  • तरुणांनो, आत्मपरीक्षण करा!
  •  एकीकडे: शिवविचारांचे पुस्तक वाचणारा, व्याख्यान ऐकणारा आणि गरजूंना मदत करणारा तरुण.
  • दुसरीकडे: बुलेटचा सायलेन्सर वाजवून लोकांचे लक्ष वेधून घेणारा हुल्लडबाज.

  माँसाहेब जिजाऊ आऊसाहेबांनी शिवरायांना दिलेले संस्कार हे रयतेचे रक्षण करण्यासाठी होते, त्यांच्याच विचारांचा वारसा व आदर्श जपणारे तरुण असा विकृत व समाजाला त्रास देणारी कृती करणार नाही. कोरेगाव भिमा, सणसवाडी , शिक्रापूर येथील या हुल्लडबाजीला पायबंद घालण्यासाठी आता समाजाने आणि प्रशासनाने एकत्र येण्याची गरज आहे.

प्रशासनाने दाखवलेला हा पवित्रा कायम राहिला आणि अशा हुल्लडबाजांवर नियमित कारवाई सुरू राहिली, तरच खऱ्या अर्थाने शिवजयंतीचे हे पावन पर्व गोंगाट नव्हे तर विचारजागर म्हणून साजरे होईल. शिवरायांच्या विचारांचा जागर करायचा असेल तर त्यासाठी बुलेटचा आवाज नव्हे तर समाजोपयोगी कार्याची गरज आहे, हेच या सर्व प्रकारातून अधोरेखित होत आहे.

बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचे आवाज काढून रयतेला वेठीस धरणाऱ्यांचा उच्छाद आता सहन केला जाणार नाही. अशा हुल्लडबाजांची दखल घेतली असून, त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांच्या गाड्या थेट पोलीस ठाण्यात जमा केल्या जातील. बुलेटचा आवाज काढून गोंगाट करणाऱ्या प्रवृत्तींना ‘खाकी’चा इंगा दाखवला जाईल.”— पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड , शिक्रापूर पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!