शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

Swarajyatimesnews

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.

 या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर, जांभेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व शिक्षकांनी जुने विद्यार्थी सामाजिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. त्यांच्या पाल्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात प्रतिष्ठा मिळवल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्रात के.ई.एम हॉस्पिटलमधील नर्स मंगल सासवडे, तसेच शिक्रापूर पीएससीतील आशा वर्कर कल्पना सासवडे व ढोकले यांनी उपस्थितांना उपयोगी आरोग्य टिप्स दिल्या.

  या प्रसंगी शिक्रापूरचे विद्यमान आदर्श सरपंच रमेश गडदे, कासारीचे माजी सरपंच राजेंद्र रासकर, सणसवाडीचे माजी सरपंच राजेंद्र हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, तसेच शिक्रापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अनिल राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य, व्यवसाय व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले. यावेळी जयश्री धुमाळ, धर्मराज बोत्रे, सरपंच रमेश गडदे यांनी आपली मनोगते व्यक्त करत सर्वांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय चव्हाण गुरुजी यांनी तर आभारप्रदर्शन सरपंच रमेश गडदे यांनी केले. सतीश गायकवाड, शैलेश मांढरे आणि शेखर हिरवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

  कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गस्थ गुरुजन व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वृक्षारोपण व भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!