प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हे बदलीपूर्वी नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांचा गुन्हे तपासातील प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी आळे फाटा, शिक्रापूर, चाकण, वाकड, हिंजवडी आणि सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रभावी सेवा बजावली आहे. खून, दरोडा आणि संघटित गुन्हेगारी अशा गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि फरार आरोपींच्या शोधासाठी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. अनुभवी आणि तपासाची विशेष जाण असलेल्या अधिकाऱ्याची या पदावर गरज होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ स्तरावरून क्षीरसागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
”जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे गुप्त माहितीचे जाळे अधिक सक्षम करण्यात येईल. फरार आरोपींचा शोध आणि संघटित गुन्हेगारीवर विशेष लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात येईल. पारदर्शक आणि वेगवान तपासाद्वारे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यास प्राधान्य दिले जाईल.” — प्रमोद क्षीरसागर (प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)
