कोरेगाव भिमा (ता. शिरूर): गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत असलेल्या कोरेगाव भिमा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने निर्माण झालेला पाण्याचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागणार असून, बंधाऱ्याच्या ‘की-वॉल’ (संरक्षक भिंत) बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
पाठपुराव्याला यश; पाणीप्रश्न सुटणार – सुमारे ३७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याची संरक्षक भिंत पूर्णपणे वाहून गेल्याने १७८३ हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधित झाले होते. तसेच, परिसरातील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आणि स्थानिक उद्योगांवरही याचे सावट पसरले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोरेगाव भिमा ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले आहे.
प्रशासनाचे मोलाचे सहकार्य – या कामासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विशेष सहकार्य केले. प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली झाल्यामुळे तांत्रिक अडथळे दूर होऊन कामाला गती मिळाल्याची माहिती सरपंच संदीप ढेरंगे यांनी यावेळी दिली.
यावेळी दशरथ वाळके (पेरणे), माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ (पिके) गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे.
अशोक गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, केशव फडतरे, पोलीस पाटील नितीन ढोरे, सुनील सव्वाशे, सुनील गव्हाणे, बन्सी साळुंखे, तानाजी ढेरंगे, प्रदीप खलसे, आदिनाथ नळकांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार व पृथ्वीराज फलके यांनीही कामाच्या ठिकाणी भेट देऊन तांत्रिक पाहणी केली व कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना दिल्या.
