ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास)
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) असा बदल करण्यास राज्यातील १४ आयटीआय यांचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सरपंच (Sarpanch) आणि उपसरपंचासाठी(Upasarpanch) एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने नुकतंच याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात आले असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.
आता दरमहा किती मानधन मिळणार ? राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती देताना भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आज कॅबिनेटमध्ये राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन ३ हजारवरुन ६ सहा हजार करण्यात आले आहे. तर उपसरंपचाचे मानधन हे १ हजारवरुन २ हजार करण्यात आले आहे.
तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ते ८ हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन ४ हजारवरुन ८ हजार तर उपसरपंचाचे मानधन पंधराशेवरुन ३ हजार रुपये इतके करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजार पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन ५ हजारवरुन १० हजार, तर उपसरपंचाचे मानधन २ हजारवरुन ४ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक ११६ कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार असल्याचे माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. तर राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील सरपंच आणि उपसरपंचामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याशिवाय राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलं आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला राजर्षि शाहू महाराजांचे तर बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव देण्यात आलं आहे.