ठिकाण बदलले, राज्य बदलले, हरियाणात लपले; पण शिक्रापूर पोलिसांनी शोधून काढले!

Swarajyatimesnews

डिंग्रजवाडीतील पाच लाखांचे सर्व्हे मशिन चोरीप्रकरणी दोघांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर आंतरराज्यीय कारवाई

उदयकांत ब्राम्हणे

शिक्रापूर (ता. शिरूर) चोरी केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आरोपींनी राज्य बदलले, ठिकाण बदलले आणि हरियाणात जाऊन आश्रय घेतला; मात्र शिक्रापूर पोलिसांची तपासाची चक्रे थांबली नाहीत. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर अखेर आरोपींचा माग काढण्यात आला. डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील कंपनीतून पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या दोघांना हरियाणा आणि पुण्यातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांच्या या आंतरराज्यीय कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.

डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा. लि. स्कॅलार स्पेसेस कंपनीत जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे महागडे सर्व्हे मशिन ठेवण्यात आले होते. सुमारे पाच लाख रुपये किमतीचे हे मशिन चोरीला गेल्याने कंपनीत खळबळ उडाली होती. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

चोरीचा गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले आणि गुन्हे शोध पथकाला तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. संशयितांचा माग काढताना तपासाचे धागेदोरे राज्याबाहेरपर्यंत पोहोचले.

या तपासात हरी किशन जाटो (वय २४, रा. जोधपूर, राजस्थान) हा आरोपी हरियाणा राज्यात असल्याचे समोर आले. पोलिसांनी हरियाणात जाऊन त्याला ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा. खडकी) याला विश्रांतवाडी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

विशेष म्हणजे, चोरीनंतर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीची सांगड घालत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. आता या आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, तसेच या चोरीमागे अन्य कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार अजित इंगवले करीत आहेत.

हरियाणापर्यंत पोहोचले तपासाचे धागेदोरे आणि अखेर दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. राज्याच्या सीमा ओलांडून केलेल्या या कारवाईतून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, गुन्हा करून कितीही दूर पळाले तरी कायद्याच्या तपासापासून सुटका नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!