‘अशोक बाप्पू, २०२९ च्या विधानसभेसाठी इकडे या!’

Swarajyatimesnews

वैतागलो राव… इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही’; मुखईकरांची व्यथा

शिक्रापूर, ता. २९ 

अशोक बाप्पू, सन २००९ पासून थेट आमदारांशी संवाद साधणेच बंद झाले आहे. इकडच्या नेत्यांना साधा फोनही करता येत नाही. तुम्ही आता इकडे आलात तर आम्हाला तुम्हाला मतदान करण्याची संधी तरी मिळेल. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी या आणि सन २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही तुम्हीच इकडे या…,” अशा शब्दांत मुखईकरांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींबाबतची खंत व्यक्त केली. ग्रामस्थांनी माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक पवार यांना प्रस्तावित स्वतंत्र शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणूनच निमंत्रण दिले.

मुखई (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुखईसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर गावातील श्री खंडोबा मंदिरात माजी आमदार अशोक पवार तसेच बँकेचे मुख्य व्यवस्थापक संजय शितोळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून मनात असलेल्या आपल्या भावना व्यक्त करत परिसरातील पाणीप्रश्न, विकासकामे आणि लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क होत नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी माजी सभापती शंकर जांभळकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, उपसरव्यवस्थापक सुनील खताळ, विभागीय अधिकारी सचिन रणदिवे, विशेष वसुली अधिकारी कुलदीप जंगम, विकास अधिकारी किशोर दरेकर, शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर गवारी, मुखईचे सरपंच रमेश पलांडे, उपसरपंच पुष्पा खलसे, माजी सरपंच सुरेश पलांडे, युवराज पलांडे, ज्ञानेश्वर पलांडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा पूजा भुजबळ, अतुल धुमाळ, पिंपळे धुमाळ संस्थेचे अध्यक्ष निलेश धुमाळ, संचालक गणपत गावडे, मुखई सोसायटीच्या अध्यक्षा विमल पलांडे, पद्मावती पलांडे, विजय येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पलांडे यांनी केले, तर विजय येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ना विधानसभेत प्रश्न, ना पाणी; साधा फोनही करता येत नाही… या परिसरातील तब्बल १२ गावांचा पाणीप्रश्न सन २००९ पासून प्रलंबित असल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. “हा प्रश्न कधी विधानसभेत प्रभावीपणे मांडला गेला नाही, तसेच त्यावर खुली चर्चा होऊन ठोस तोडगा निघाल्याचेही दिसून आले नाही,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

“आमदार म्हणून अशोक पवार आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी ज्या पद्धतीने सातत्याने थेट संवाद ठेवतात, तसा संवाद शिरूर मतदारसंघातील ३९ गावांतील मतदारांना मिळत नसल्याची खंत आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

यावेळी येऊ घातलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसह सन २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक पवार यांच्या संभाव्य उमेदवारीच्या उल्लेखाचे ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

‘एमआयडीसी’बाबत मला शिरूरकर म्हणून भूमिका घ्यावीच लागेल : अशोक पवार

पाबळ–धामारी परिसरात शासनाने एमआयडीसी प्रस्तावित केली असून ७४६ हेक्टर क्षेत्रासाठीचे राजपत्र प्रसिद्ध झाल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित नागरिकांनी उपस्थित केला. शिरूर–आंबेगाव परिसरातील नेते, पदाधिकारी आणि विधानसभा प्रतिनिधी या विषयावर मौन बाळगत असल्याची चर्चा उपस्थित ग्रामस्थांमध्ये सुरू असतानाच माजी आमदार अशोक पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

“पाबळ–धामारी परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीबाबत मला शिरूरकर म्हणून नेमकी भूमिका घ्यावीच लागेल. या भागाशी माझे नाते आहे. नागरिकांच्या भावना जाणून घेऊन या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करणे ही माझी जबाबदारी आहे,” असे अशोक पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!