स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमकावून सोशल मीडियावरील बातम्या आणि डिजिटल पुरावे हटविण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिंदोडी (ता. शिरूर) येथील पत्रकार तथा शेतकरी तेजस रामदास फडके यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात रांजणगाव गणपती येथील विकास कुटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 351(2), 351(3) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस फडके हे सामाजिक, प्रशासकीय आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर सातत्याने वृत्तांकन करीत आहेत. अलीकडेच त्यांनी शासनाचे लोगो लावून फिरणाऱ्या संशयास्पद वाहनांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तांकनानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीनुसार, विकास कुटे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले व्हिडीओ, बातम्या आणि अन्य डिजिटल पुरावे हटविण्याची मागणी केली. तसेच संबंधित साहित्य हटविले नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली असून, पत्रकार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. पत्रकारांना धमकावून अथवा दबावाखाली आणून वृत्तांकनावर परिणाम करण्याचे प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात २ जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोबाईल संभाषण, डिजिटल पुरावे, सोशल मीडिया नोंदी आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर – पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना धमक्या देणे, दबाव टाकणे किंवा डिजिटल पुरावे हटविण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
