भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून विकासाचा संकल्प; गाणगापूर-अक्कलकोट-तुळजापूर दर्शनासाठी शेकडो भाविक मार्गस्थ!
वाडेबोल्हाई (ता. हवेली): वाडेबोल्हाईच्या मातीत भक्ती आणि सेवेचा वारसा अधिक समृद्ध करत, माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे व उद्योजक श्रीकांत गावडे यांच्या वतीने आयोजित ‘तुळजापूर-अक्कलकोट-गाणगापूर’ या भव्य मोफत देवदर्शन यात्रेचे रविवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. वेताळेश्वर क्रिकेट ग्राउंडवरून भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘आई भवानी’ व ‘स्वामी समर्थांच्या’ जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
भक्तीचा सोहळा आणि ‘जनसेवेचा’ अजेंडा ही केवळ एक देवदर्शन यात्रा नसून, ते ‘भक्तीतून शक्ती’ निर्माण करण्याचे एक माध्यम ठरले आहे. या यात्रेच्या निमित्ताने सविता गावडे आणि श्रीकांत गावडे यांनी गावातील माता-भगिनी आणि ज्येष्ठांशी थेट संवाद साधला. प्रवासादरम्यान गावातील मूलभूत समस्या जाणून घेणे, महिलांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यातून वाडेबोल्हाईच्या सर्वांगीण विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार करणे, हा या उपक्रमामागचा व्यापक उद्देश आहे.
भक्तांचा उदंड प्रतिसाद; डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा – यात्रेसाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होता. गावडे परिवाराने केवळ प्रवासाचीच नाही, तर भाविकांच्या निवास, सात्विक भोजन आणि सुरक्षित दर्शनाची ‘VIP’ दर्जाची व्यवस्था केली आहे. “आमच्यासाठी हे केवळ तीर्थाटन नाही, तर गावडे परिवाराने दिलेली प्रेमाची शिदोरी आहे,” अशी भावना अनेक महिला भाविकांनी व्यक्त केली.
या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने यावेळी माजी सरपंच सविता श्रीकांत गावडे, उद्योजक श्रीकांत गावडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून यात्रेला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

गावातील ज्येष्ठांच्या आयुष्यात आध्यात्मिक आनंद निर्माण करणे, हा आमचा प्राथमिक उद्देश आहेच. परंतु, या प्रवासाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन वाडेबोल्हाईला सर्व सोयी-सुविधांनी युक्त आणि आदर्श गाव बनवणे, हा आमचा खरा विकासाचा अजेंडा आहे. सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून आम्ही परिवर्तनासाठी कटिबद्ध आहोत.”— माजी उपसरपंच सविता श्रीकांत गावडे , वाडेबोल्हाई
