धक्कादायक !  शिरूरच्या मांडवगण फराटा परिसरात दोन गटांत गोळीबार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Swarajyatimesmews

दोन्ही गटांकडून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; बॅनरवरील फोटोवरून वादाचे पर्यावसान संघर्षात

शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ स्टेडियम परिसरात गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरील फोटो आणि जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले असून, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचे (कलम ३०७) स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पहिली फिर्याद: मध्यस्थीच्या बहाण्याने बोलावून गोळीबार : या प्रकरणी पहिली फिर्याद अक्षय गोविंदा पाटील (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी दिली आहे. अक्षय यांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अमोल चौगुले याने त्यांना जुने भांडण मिटवण्यासाठी मांडवगण फराटा येथे बोलावले होते. अक्षय तेथे पोहोचले असता अमोल चौगुले व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, संदीप गिरे याने अक्षयच्या दिशेने पहिली गोळी झाडली. अक्षयने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र अमोल चौगुले याने स्वतः पिस्तूल हाती घेऊन पुन्हा गोळीबार केला. ही गोळी अक्षयच्या उजव्या बरगडीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अमोल चौगुले, संदीप तेलंग आणि संदीप गिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद: बॅनरच्या वादातून हल्ला आणि दगडफेक : याच घटनेत दुसरी फिर्याद मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (रा. मांडवगण फराटा) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर सूत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्याच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी अमोल चौगुले सायंकाळी ७ च्या सुमारास स्टेडियमवर गेले असता, अक्षय पाटील आणि पप्पू कड यांनी त्यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार केला. यावेळी जीव वाचवून पळत असताना सूत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर यांच्यासह १०-१२ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस तपास आणि फरार आरोपींचा शोध : एकाच दिवशी झालेल्या या दोन गंभीर घटनांमुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि खटिंग या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!