शिक्रापूर (ता. शिरूर) “जाती-पातीच्या भिंती ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने गावचा आणि देशाचा विकास होतो,” हाच संदेश शिक्रापूरने पुन्हा एकदा संपूर्ण शिरूर तालुक्याला दिला आहे. पवित्र रमजान महिन्यातील २५ व्या रोजाच्या निमित्ताने, शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीने सामाजिक सलोख्याचे आणि धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवले आहे.
फलाहार आणि सुकामेव्याचे वाटप – रमजान महिना हा संयम आणि प्रार्थनेचा महिना मानला जातो. या पवित्र काळात रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) सरपंच रमेश गडदे यांनी विशेष पुढाकार घेत फलाहार व सुकामेवा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये खजूर, विविध प्रकारची फळे आणि सुकामेव्याचे वाटप करून मुस्लिम बांधवांचा सन्मान करण्यात आला. शिक्रापूरमधील या उपक्रमाचे ‘एकता’ आणि ‘बंधुभावा’चे प्रतीक म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी माजी पोलीस अधिकारी नाना हिरवे, पोलीस पाटील ज्ञानोबा विरोळे, महेश शिर्के, तथागत मैत्री संघाचे अध्यक्ष मेश्राम सर, सुनील हेलोडे, महेश ब्राम्हणे, शक्ती केंडे, दत्ता गायकवाड, मेजर तुकाराम डफळ, हार्दिक गडदे, शालेय समिती अध्यक्ष अमोल कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थांनी उपस्थिती लावून एकोप्याचा संदेश दिला.
तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने हाजी शिराजभाई शेख, मौलाना अशरफभाई, समशेरभाई तांबोळी, अयुबभाई तांबोळी, महम्मदभाई तांबोळी, फिरोजभाई तांबोळी, हाजी आसिफभाई तांबोळी, इसाकभाई तांबोळी, इम्रानभाई तांबोळी, जमीरभाई तांबोळी व इतर बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोजभाई तांबोळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार हाजी शिराजभाई शेख यांनी मानले. सरपंच आणि ग्रामस्थांच्या या प्रेमळ पुढाकारामुळे मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त केला. फलाहार झाल्यानंतर सर्व बांधवांनी एकत्र येत इफ्तार केला आणि देशात शांतता व समृद्धी लाभो, अशी सामूहिक प्रार्थना केली.
“गावचा विकास करताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे, हीच खरी शिक्रापूरची संस्कृती आहे. सण कोणतेही असोत, आपण ते एकत्रित साजरे केल्यास समाजात प्रेम आणि विश्वास वाढतो. हा सलोखा असाच टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.”

