लाठी-काठी आणि कराटे प्रशिक्षणाचा नवा ‘सांगली पॅटर्न’ आता राज्यभर!”
महिला सबलीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ५ लाख विद्यार्थिनींना आता केवळ मोफत शिक्षणच नव्हे, तर ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून दरमहा दोन हजार रुपयांचा भत्ताही दिला जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलींना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘कन्या सबलीकरण’ उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण (कराटे) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना ‘येलो बेल्ट’ आणि प्रमाणपत्र वाटपाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी महिला सुरक्षेचा नवा ‘सांगली पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवण्याचा मानस व्यक्त केला. सांगलीतील ५० शाळांमधील ३६ हजार मुलींना दर शनिवारी कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यातील १५ हजार ४०० मुलींनी पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या मुलींना पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी लागणारे सर्व शुल्क आता शासन भरणार असून, आगामी जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत मुलींसाठी ‘लाठी-काठी’चे विशेष प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात मुलींच्या स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले होते. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. “मुलींचे हे स्वसंरक्षण कौशल्य पाहून मला माझ्या दोन मुलींची आठवण झाली. मुली इतक्या सक्षम होत आहेत हे पाहून माझे म्हातारपण आता नक्कीच सुखरूप जाईल,” असे विधान खासदारांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला.
राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने यापूर्वीच कॉलेज आणि हॉस्टेल फी माफ केली आहे. आता त्यात मासिक भत्त्याची जोड मिळाल्याने शिक्षणाच्या प्रवाहात मुलींची संख्या लक्षणीय वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि हजारो प्रशिक्षणार्थी मुली मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून जाहीर झालेल्या या निर्णयांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
