मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकन्या साक्षी इंगळेचा शाही गौरव
वाडे बोल्हाई (ता. हवेली): भक्तीचे अधिष्ठान लाभलेल्या श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या पावन भूमीत आज ‘शक्ती’चा जागर झाला. निमित्त होते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या मानाच्या गदेच्या प्रथम पूजनाचे! महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या या गदेचे दर्शन घेण्यासाठी अवघी बोल्हाई नगरी लोटली होती. याच सोहळ्यात हिमाचल प्रदेशात पार पडलेल्या अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या गावची सुकन्या पै. साक्षी गुलाब इंगळे हिचा ‘गोल्डन गर्ल’ म्हणून शाही सत्कार करण्यात आला.यावेळी रामकृष्ण सातव पाटील, उद्योजक रमेश हरगुडे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयाचा श्रीगणेशा: बोल्हाई मातेच्या चरणी गदा पूजन – महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मानबिंदू आणि प्रत्येक मल्लाचे स्वप्न असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या भव्य गदेचे पहिले पूजन करण्याचा मान श्री क्षेत्र वाडे बोल्हाई गावाला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘बोल्हाई माता की जय’च्या जयघोषात ही गदा बोल्हाई देवीच्या गाभाऱ्यात आणण्यात आली. बोल्हाई देवी धर्मादाय संस्थेचे विश्वस्त, संचालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारांच्या घोषात गदेचे पूजन झाले. “या गदेला देवीचा आशीर्वाद मिळाला असून, जो मल्ल ही गदा खांद्यावर घेईल, तो महाराष्ट्राच्या मातीची शान वाढवेल,” अशा भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केल्या.

वाडे बोल्हाईच्या कन्येने उंचावली देशाची मान – या सोहळ्याचा सुवर्णक्षण ठरला तो म्हणजे पैलवान साक्षी गुलाब इंगळे हिचा गौरव. हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा २५-२६’ मध्ये साक्षीने अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत भारतामध्ये प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) पटकावला. लाल मातीतील ही जिद्द राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केल्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. एका बाजूला मानाची गदा आणि दुसऱ्या बाजूला सुवर्णपदक विजेती कन्या, असा अभूतपूर्व संगम पाहून उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांना अभिमान वाटला.

या मंगलप्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व आजी-माजी पदाधिकारी, बोल्हाई देवी धर्मादाय संस्थेचे सर्व संचालक व विश्वस्त, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडे बोल्हाईच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
