वाघोलीच्या बीजेएस विद्यालयाला राज्य शासनाचा ‘अ प्लस’ दर्जा

Swarajyatimesnews

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत वाघोली (ता. हवेली) येथील भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) माध्यमिक विद्यालयाने बाह्य मूल्यांकनात ‘अ+’ (A+) श्रेणी प्राप्त केली आहे. राज्याच्या ४२९ गुणवंत शाळांच्या यादीत बीजेएस विद्यालयाने स्थान मिळवल्याने शिक्षण क्षेत्रात संस्थेचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचे मानक ठरवण्यासाठी ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण’ कक्षाची स्थापना केली आहे. या अंतर्गत राज्यातील १ लाख २ हजार ६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले होते. त्यापैकी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या १० हजार ७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. या कडक चाचणीत ज्या ४२९ शाळांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्यात वाघोलीच्या बीजेएस विद्यालयाचा समावेश झाला आहे.

विद्यालयाने शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाच्या जोरावर ही श्रेणी मिळवली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था, प्रबंध समितीचे अध्यक्ष विलासजी राठोड, शाळा समिती अध्यक्ष अरुणजी नाहर आणि प्रकल्प व्यवस्थापक सुरेशजी साळुंखे यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले.

प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपट गेठे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या यशामुळे वाघोली (ता. हवेली) परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!