अजितदादांवरील प्रेम मतदानातून व्यक्त होणार; सुभाष जगताप यांनी व्यक्त केली जनभावना
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि जनसामान्यांचे ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यासह हवेली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मात्र, या दुःखाच्या प्रसंगी कोरेगाव मूळ-केसनंद गटातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले असून, दादांवरील हेच प्रेम आता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाची ‘लाट’ निर्माण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप यांनी या परिसरातील जनभावनेचा आढावा घेताना सांगितले की, “दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. पण आज ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या डोळ्यांत जे अश्रू आहेत, त्याचे रूपांतर आता दादांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्याच्या निर्धारात झाले आहे.”

शेतकरी आणि कष्टकऱ्यांची ‘भावनिक’ साद : कोरेगाव मूळ-केसनंद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिन्ही उमेदवारांना मिळणारा पाठिंबा आता केवळ राजकीय राहिला नसून तो भावनिक झाला आहे. अजितदादांचे या भागातील विकासकामांशी असलेले घट्ट नाते आणि त्यांनी नेहमीच दिलेला मदतीचा हात, यामुळे स्थानिक लोक भारावून गेले आहेत. “आमच्या पाठीशी उभा राहणारा आमचा ‘आधार’ गेला आहे, आता त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

विजयासाठी मतदारांनीच कसली कंबर : प्रचाराच्या दरम्यान असे पाहायला मिळत आहे की, केवळ कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य नागरिक, महिला आणि तरुण स्वतःहून प्रचारात उतरले आहेत. अजितदादांच्या अकाली निधनाचा जनमानसावर मोठा परिणाम झाला असून, कोरेगाव मूळ-केसनंद गटातील राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार:
सुरेखा रमेश हरगुडे केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट, कृषिराज उर्फ मनोज दत्तात्रय चौधरी (कोरेगाव मूळ गण), प्रमोद चंद्रकांत हरगुडे (केसनंद गण) यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला आहे. दादांच्या निधनाचे दुःख मतदानातून व्यक्त होईल आणि राष्ट्रवादीचे हे तिन्ही शिलेदार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार : आरोग्य, पाणी, शेती आणि ग्रामीण पायाभूत सुविधांबाबत अजितदादांनी जो अजेंडा मांडला होता, तोच अजेंडा हे उमेदवार पुढे नेणार आहेत. “दादांनी या भागाला नेहमीच झुकते माप दिले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेली विकासकामे थांबणार नाहीत, याची खात्री मतदारांना आहे,” असे प्रतिपादन सुभाष जगताप यांनी केले.एकूणच, कोरेगाव मूळ-केसनंद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असलेली ही भावनिक लाट विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
