प्रतिनिधी राजाराम गायकवाड
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात यश आले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बिबट्याच्या वाढत्या हालचाली लक्षात घेऊन शिरूर वनविभागाच्या वतीने चाकण रोडवरील जगताप वस्ती येथे शिवराज जगताप यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास शेजारील गजानन जगताप शेतात गेले असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभागाला दिली.

माहिती मिळताच शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, वन्यजीव बचाव पथकातील शेरखान शेख, वैभव निकाळजे, अमोल कुसाळकर, परमेश्वर दहीरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी उपसरपंच विजय ढमढेरे, पोपट जगताप, अमोल ढमढेरे, बालाजी पसारे, धनराज सोनटक्के, दादाभाऊ भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले.
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या अंदाजे अडीच वर्षांचा असून तो मादी प्रवर्गातील आहे. या बिबट्याची पुढील उपचार व निगा राखण्यासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
