धक्कादायक! पुण्यातील भोंदूबाबा ‘स्पायवेअर’च्या माध्यमातून भक्तांचे खासगी क्षण रेकॉर्ड करून अश्लील कृत्यांना करायला करत होता प्रवृत्त

Swarajyatimesnews

पुणे: बावधन पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक करून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. हा बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप स्पायवेअर ॲप (Spyware App) डाऊनलोड करून त्यांच्या खासगी आयुष्यावर थेट मोबाईल कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवत होता आणि त्यांचे खाजगी क्षण चित्रीत करत होता.

प्रसाद उर्फ भीमराव तामदार (वय २९, रा. सुसगाव, मुळशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘दिव्य शक्ती’चा दावा आणि फसवणुकीचा कट – तामदार हा बावधन परिसरात स्वतःकडे ‘दिव्य शक्ती’ असल्याचा दावा करत शेकडो भक्तांवर मानसिक प्रभाव टाकत होता. त्यांच्या जीवनात मोठे संकट येणार असल्याचे किंवा मृत्यू टळण्यासाठी विशिष्ट धार्मिक क्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे तो भक्तांना पटवून देत असे. या क्रियेच्या नावाखाली तो भक्तांना एकांतात बोलावून त्यांचा मोबाईल हातात घेत असे, पासवर्ड विचारून त्यामध्ये ‘AirDroid Kid’ नावाचे एक छुपे ॲप इन्स्टॉल करत असे.

हे ॲप एकदा मोबाईलमध्ये आले की, बाबाला त्या मोबाईलच्या कॅमेरा, माइक आणि लोकेशनवर थेट नियंत्रण मिळायचे. यामुळे तो भक्त कुठे आहे, काय कपडे घातले आहेत, दिवसभरात काय केले – ही सर्व माहिती बाबा फोनवरून त्यांनाच सांगत असे. यामुळे भक्तांचा त्याच्यावर विश्वास अधिक वाढत गेला आणि ते त्याच्या जाळ्यात अधिक खोलवर अडकत गेले.

अमानवी कृत्यांचा पर्दाफाश – या प्रकरणाचा सर्वात घृणास्पद आणि अमानवी भाग म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका हवी असल्याची विनंती केली असता, बाबाने त्यांना वेश्या किंवा प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा विकृत सल्ला दिला. विशेष म्हणजे, संबंध ठेवताना मोबाईल विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगून तो त्या क्षणांचे थेट चित्रीकरण करत होता.

फसवणूक कशी उघड झाली? – एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राकडे दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने तपासणी केली असता, मोबाईलमध्ये ‘हिडन ॲप’ आढळले. या ॲपच्या माध्यमातून मोबाईल बाहेरून ऑपरेट होत असल्याचे लक्षात आले. संबंधित भक्ताला आपला मोबाईल केवळ बाबालाच दिल्याचे आठवले.

यानंतर इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्या मोबाईलमध्येही हेच ॲप असल्याचे निष्पन्न झाले. सर्व भक्तांनी एकत्र येत बाबाला जाब विचारला असता, त्याने तक्रार न करण्याची विनवणी केली. मात्र एका तरुण भक्ताने हिंमत दाखवत ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांची तात्काळ कारवाई आणि तपास सुरू – माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तामदारला अटक केली. शुक्रवारी (२७ जून) बावधन पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली आणि अनेकांनी अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे सांगितले. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचा मोबाईल आणि त्यामध्ये वापरलेले ॲप्स तपासण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या डिजिटल पुराव्यांमधून भक्तांचे आरोप सत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता, आयटी ॲक्ट, आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीने भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले, कुठे शेअर केले आणि त्याचा कसा वापर केला, याचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे. पोलिसांनी इतर संभाव्य पीडितांनीही पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!