सांगली, (आटपाडी): बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला नीट (NEET) परीक्षेच्या चाचणीत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका मुख्याध्यापक बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातून समोर आली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक पित्यास अटक करण्यात आली आहे.
कमी गुणांमुळे संताप, मुलीचे ‘उलट उत्तर’ आणि अमानुष मारहाण – धोंडीराम भोसले हे नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत, तर त्यांची पत्नी प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच आहेत. साधना भोसले ही बारावीमध्ये शिकत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होतं. तिने दहावीत ९२.६०% गुण मिळवून गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकावला होता, त्यामुळे तिच्याकडून कुटुंबाला खूप अपेक्षा होत्या.
दोन दिवसांपूर्वी घरी आलेल्या साधनाने वडिलांना नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे सांगितले. यावर संतप्त झालेल्या धोंडीराम भोसले यांनी “मी तुझ्यासाठी इतका खर्च करतोय? तू कशी डॉक्टर होणार?” असा जाब विचारला. यावर साधनाने, “पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते ना? तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात!” असे उलट उत्तर दिले.
मुलीचे हे उत्तर ऐकून धोंडीराम भोसले प्रचंड चिडले. त्यांनी रागाच्या भरात साधनाला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. त्यांनी मुलीच्या पोटात लाथाही घातल्या. पत्नी प्रीती भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर ते काही काळ थांबले, परंतु थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा एकदा साधनाला मारहाण केली.
जखमी अवस्थेत टाकून बाप योग दिनासाठी निघून गेला, परतला तेव्हा – या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली. मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की ती घरात बेशुद्ध पडली. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. परंतु, धोंडीराम भोसले यांनी साधनाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले नाही. उलट, दुसऱ्या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले.शाळेतून परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेतच दिसली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच तिने जीव गमावला होता. डॉक्टरांना मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आईच्या फिर्यादीनंतर मुख्याध्यापक पित्याला अटक – साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर रविवारी मुख्याध्यापक वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हुशार साधनाचा केवळ कमी गुण मिळाल्यामुळे आणि दिलेल्या उलट उत्तरामुळे मुख्याध्यापक वडिलांकडून झालेल्या मारहाणीत हकनाक बळी गेला, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.