वाडेबोल्हाईत एसटी आणि कारचा भीषण अपघात

Swarajyatimesmews

दुचाकीस्वाराला वाचवताना दोन्ही वाहने खड्ड्यात, सुदैवाने जीवितहानी टळली

वाडेबोल्हाई, (ता. हवेली): वाघोली-राहू रस्त्यावर वाडेफाटा नजीक शुक्रवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एसटी बस आणि एका चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शुक्रवार दिनांक २२ जून रोजी सकाळी शिवाजीनगर (पुणे) येथून दौंड तालुक्यातील वाळकीकडे जाणारी एसटी बस (एम.एच.०६, एस.८३४३) आणि पिंपरी चिंचवडहून शिरूर तालुक्यातील नागरगावकडे जाणारी चारचाकी कार (एम.एच.१२, एन.पी.७७४०) ही दोन्ही वाहने वाडेबोल्हाई येथील वाडेफाट्यापाशी एकाच दिशेने जात होती. कार एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरून अचानक एक दुचाकी आली. त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील महिला चालकाचे नियंत्रण सुटले. कार एसटीच्या बंपरला अडकून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

प्रवासी सुखरूप; ग्रामस्थांनी केली मोलाची मदत – या अपघातात एसटी बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. कारमधील महिला चालक आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिलाही थोडक्यात बचावल्या असून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर तातडीने वाडेबोल्हाई येथील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.  माजी सरपंच दीपक गावडे, उद्योजक राहुल शिंदे, योगेश पायगुडे, संतोष शितोळे, राजू पायगुडे, माऊली पायगुडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एसटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली, असे वायरमन अमोल पायगुडे यांनी सांगितले.

वाघोली-राहू, पारगाव हा रस्ता हवेली आणि दौंड या दोन तालुक्यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि शासनाने या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून नूतनीकरण करावे, नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा.  – किर्ती अमोल पायगुडे,माजी उपसरपंच तथा सदस्या-ग्रामपंचायत वाडेबोल्हाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!