शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शिक्रापूर (ता.शिरूर): क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान झेंडू पवार यांना ‘मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया आणि दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड यांच्या वतीने हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील लाल मातीतील खेळाडूंना घडवण्यासाठी झेंडू पवार यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे शिरूर तालुक्याला कुस्ती क्षेत्रात अनेक मल्ल लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली असून, त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्यानंतर, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने आयोजित भटक्या विमुक्त दिनानिमित्तच्या कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक संतोष हराळे, प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ, माजी संचालक (शिक्षण विभाग) पवार साहेब, आणि साहित्यिक भरत विटकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
हा बहुमान मिळाल्याबद्दल श्री. म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, तसेच शिरूर आणि पुणे जिल्ह्यातील असंख्य खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थांनी पैलवान झेंडू पवार यांचे अभिनंदन केले आहे.
