कोरेगाव भीमा (ता. शिरूर), दि. १५ डिसेंबर २०२५, अहमदनगर–पुणे महामार्गावर सोमवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.वाडा पुनर्वसन फाट्याजवळ फर्ची ओढ्याजवळ जवळ भरधाव वेगात असलेल्या वॅग्नर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात ५९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पती रामचंद्र दाभाडे गंभीर जखमी झाले आहेत
पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा परिसरात हा थरारक अपघात घडला. एम एच १४ डी एक्स ९८८१ क्रमांकाची वॅग्नर कार पुण्याच्या दिशेने वेगाने जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम एच १२ एच डी ८९९९ क्रमांकाच्या ट्रकच्या मागील बाजूस जाऊन आदळली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघातातील वाहनाच्या धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की वॅग्नर कारचा पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील प्रवासी जोरदार धडकेमुळे आत अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
महिलेचा दुर्दैवी अंत : या अपघातात निलम संपत दामाडे (वय ५९, रा. मांजरी बु., ता. हवेली, जि. पुणे) या महिलेच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वॅग्नर कारमधील पती रामचंद्र दाभाडे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.सदर प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुपचे करत आहेत.
