शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचा कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करून घर बांधले होते आणि त्याबाबतचा ८ अ उतारा ग्रामसेवकाकडून नियमबाह्य पद्धतीने तयार करून घेतला होता. या प्रकरणाची तक्रार तक्रारदाराने शिरूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या अर्जाची चौकशी करून त्याचा अहवाल पुन्हा वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी भरत गायकवाड याने तक्रारदाराकडे १० ते १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. ६ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, गायकवाड याने स्वतःसाठी आणि ग्रामसेवक श्री. घासले यांच्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायंकाळी सातच्या सुमारास भरत गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.
