पाबळमध्ये ‘अजित दादांच्या’ स्मृतींनी पानावलेल्या डोळ्यांनी गहिवरलेल्या हृदयाने ग्रामस्थ भावनिक

Swarajyatimesnews

प्रफुल्ल शिवले व वंदना पवारांच्या विजयासाठी भावनिक साद!

पाबळ (ता. शिरूर) पाबळच्या मातीत आज राजकारण विरघळले आणि उरली ती फक्त आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली ‘कृतज्ञता’. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे पाबळ येथे आगमन झाले असता, हजारो ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी निर्माण झालेल्या भावूक वातावरणामुळे आगामी निवडणुकीचे पूर्ण चित्रच बदलले असून, पवार कुटुंबाच्या पाठीशी जनशक्तीचा महासागर लोटला आहे.

 ‘दादांच्या’ आठवणींनी नेत्यांना : अस्थी दर्शन सोहळ्यानंतर आयोजित शोक सभेत माजी जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणी सांगताना व्यासपीठावरच रडू कोसळले. हा प्रसंग पाहून उपस्थित हजारो आबालवृद्धांचे डोळे पाणावले. “ज्यांनी या भागाचा कायापालट केला, त्या नेत्याचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल,” असा सूर यावेळी उमटला.

दुष्काळातील ‘तहान’ भागवणाऱ्या माणुसकीची जाणीव : निवडणुकीच्या या रणधुमाळीत पवार कुटुंबाने संकटकाळात केलेली मदत केंद्रस्थानी आली आहे. भीषण दुष्काळात शासकीय मदतीची वाट न पाहता ज्यांनी स्वतःच्या खर्चाने टँकर धाडून गावाची तहान भागवली, त्या पवार कुटुंबाच्या ऋणातून उतराई होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. “आमच्या अडीअडचणीत जो धावून आला, तोच आमचा खरा प्रतिनिधी,” ही भावना आता मतदारांमध्ये घर करून बसली आहे.

 विकासाचा वारसा अन् विजयाचा निर्धार : अजित दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी वंदना प्रकाश पवार आणि प्रफुल्ल शिवले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले. केवळ राजकीय सत्ता म्हणून नव्हे, तर पाबळच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी या ‘विकासाच्या शिलेदारांना’ बळ देण्याचे आवाहन मतदारांनी स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे.”ही निवडणूक केवळ एका पदाची नसून ती ‘जाणीव’ आणि ‘विश्वासाची’ आहे. ज्यांनी काळजापासून सेवा केली, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच पाबळचा बाणा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!